बोरन्हान का करावे
संक्रांत हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे, या दिवशी सूर्य देव हे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, या निमित्ताने साजरा केला जातो. संक्रांतीनिमित्त ५ वर्षांच्या आतील लहान मुलांच बोरन्हाण संस्कार केला जातो. यामागे असणारे कारण आज आपण जाणुन घेऊया.
प्रास्ताविक
कोणत्याही बाळाच्या जन्मानंतर येणारी पहिली संक्रांत बाळासाठी अत्यंत महत्त्वाची असते. या दिवशी किंवा संक्रांतीनंतर रथसप्तमी पर्यंत लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची पद्धत आहे.परंपरेनुसार नवविवाहितेला आणि लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे म्हणजे तिळगुळाचे दागिने घालवून छान सजवतात. हा लहान मुलांसाठी एक कौतुक सोहळा असतो.
बोरन्हाण करण्याचे शास्त्रीय कारण
परंपरेनुसार बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण घातले जाते. या शिशुसंस्काराची मूळ कारण लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे असे आहे त्यामुळेच बोरन्हाण घालण्याची पारंपरिक पद्धत रूढ झाली असावी. संक्रांतीनंतर आपल्याला ऋतूमध्ये खूप प्रकर्षाने बदल होताना जाणवतात. बाळाच्या नाजूक शरीराला बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून देखील बोरन्हाण घातले जाते.
बोरन्हाण कसे करावे
बोरन्हणाच्या कार्यक्रमात लहान मुलांना आमंत्रित केले जाते.ज्या बाळाचे बोरन्हाण करायचे असेल त्याला काळ्या रंगाचे कपडे घालून छान सजवले जाते..आजकाल फोटोशूट करण्याची पद्धत आली आहे. घर किंवा घराचा कोपरा आकर्षक पध्दतीने सजवतात. रांगोळी काढून त्यावर पाट ठेवून त्यावर बाळाला बसवतात. आता त्याच्या डोक्यावरून उसाचे तुकडे, भुईमूगाच्या शेंगा, बोर, हरभरा, गाजर किंवा ऋतूनुसार मिळणाऱ्या भाज्या आणि फळं हे हळूवार टाकले जातात. लहान मुलांना त्याच्याभोवती गोलाकार बसवले जाते. या वस्तू खाली पडताना बघून लहान मुलं ती वेचून खातात. अशाने त्यांना नवीन फळं खाण्याची सवय लागते. फळे खाल्ल्यामुळे मुलांमध्ये प्रतिकार शक्ति वाढते आणि बदलत्या वातावरणात त्यांचे शरीर सुदृढ राहण्यास बळ मिळते.
बोरन्हाण कधी करावे
संक्रांतीच्या दिवसापासून ते रथ सप्तमी पर्यंत आपल्या सोयीप्रमाणे आपण कोणत्याही दिवशी बोरन्हाण करु शकतो. यासाठी कोणत्याही विशेष मुहूर्ताची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यास म्हणजेच १-३ महिने या वयातही बोरन्हाण करता येते.
या कार्यक्रमात बाळाला शक्यतो काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा त्यामागील कारण असे की थंड वातावरणात काळा रंग बाळाला ऊब देतो. हलव्याचे दागिने वापरावे ज्यात तिळाचा भरपूर उपयोग केला असतो. तसेच लूट लुटण्यासाठी मुरमुरे, बत्तासे, बोरं, हरभरा, तिळगूळ, फुटाणे, ऊसाचे तुकडे आणावे. आजकाल लोक त्यात मुलांच्या आवडीचा खाऊ, बिस्किट, चॉकलेट्सचा देखील समावेश करतात.
बोरन्हाण करण्यासाठी कोण आवश्यक असते
या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजार-पाजारी ज्यांच्याकडे मुल आहे, विशेषतः पाच वर्षांच्या आतील मुल त्यांना आमंत्रण द्यावं. खाली स्वच्छ आसान पसरवून त्यावर रांगोळी काढून पाट ठेवावा. आपल्या बाळाला त्यावर बसवून औक्षण करावं. मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ एकत्र करुन हळूवार ओतावे आणि इतर मुलांना ते लुटायला सांगावे.
बोरन्हाण आख्यायिका
बोरन्हाणच्या संदर्भात एक अशी आख्यायिका आहे की पूर्वीच्या काळात करी नांवाचा एक राक्षस होता. तो लहान मूलांना त्रास देत असे. त्याची वाईट दृष्टी आणि वाईट विचार लहान मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे बोन्हाकृष्णांवर केले गेले त्या नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केले जाते.
लहान मुलं हे देवाचे किंवा कृष्णाचे एक रूप आहे असा समज आहे. म्हणूनच त्यांच्यावर करी सारख्या राक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे सर्वांना वाटते. हेच टाळण्यासाठी लहानं मुलांवर बोरन्हाण संस्कार केला जातो. तसेच या कालावधीत वातावरणामध्ये विवीध प्रकारचे बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ शकते. हे टाळण्यासाठी ऋतु नुसार या वेळी मिळणारी फळे मुलांनी खावी यासाठी त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून किंवा लुटून फळे खाण्याची संधी दिली जाते. म्हणूनच यात बोर, तिळगूळ, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश आवर्जून केला जातो. खेळाच्या माध्यमातून मनोरंजक पध्दतीने या वस्तू मुलं वेचून खातात. आणि नकळत पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर धष्टपुष्ट, सक्षम आणि सदृढ बनते हे शास्त्रीय कारण या मागे आहे. हल्ली यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात. संक्रांतीसारखा सुंदर सण बोरन्हणाच्या सोहळ्यामुळे अधिकच खास
बनतो.
0 टिप्पण्या